भजन व संगीत परंपरेचा वारसा जपणारे श्री. रामदास (बुवा) पाटील नेरूळकर यांना “कोकणरत्न” पदवी प्रदान

  • Admin
  • नवी मुंबई
  • Dec 16, 2025

 नवी मुंबई | कोकणातील अध्यात्म, भजन व सांस्कृतिक परंपरा जपण्यासाठी आयुष्य समर्पित केलेल्या सुप्रसिद्ध भजनकार व गायक श्री. रामदास (बुवा) हंसाराम पाटील नेरूळकर यांना त्यांच्या उल्लेखनीय सांगीतिक व सामाजिक योगदानाबद्दल स्वतंत्र कोकणराज्य अभियान यांच्या वतीने प्रदान करण्यात येणाऱ्या प्रतिष्ठित “कोकणरत्न” पदवीने सन्मानित करण्यात आले.

हा सन्मान सोहळा मुंबई मराठी पत्रकार संघ भवन येथे पार पडला. सदर पुरस्कार स्वतंत्र कोकण राज्य अभियानचे अध्यक्ष श्री संजय कोकरे साहेब यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.

प्रसिद्ध भजनसम्राट हंसाराम बुवा नेरूळकर यांचे सुपुत्र असलेल्या श्री. रामदास बुवा यांनी गुरुपरंपरेतून संगीताची साधना करत भजन, शास्त्रीय संगीत व लोकसंगीत क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. गुरुदेव दत्त यांच्या कृपेने तसेच श्री. कृष्णाजी शिंदे, पं. प्रदीप दीक्षित, पं. मनोहरराव पोटदार, पं. बाळासाहेब वाईकर आणि मास्टर विनायकजी यांसारख्या मान्यवर गुरूंच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी गायन व वादनात प्रावीण्य मिळवले.

भजन, अभंग, गवळण, कोळीगीते, लावणी व भक्तिगीते यांचे सुस्वर सादरीकरण, तबला वादनातील विशेष कौशल्य तसेच सिंगिंग भजनकार व डबलवादन (जोड पखवाज) या प्रकारातील योगदानामुळे ते रसिकांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. आकाशवाणी व दूरदर्शनवरील विविध कार्यक्रमांतून त्यांच्या कलेला व्यापक व्यासपीठ लाभले आहे.

भजन सप्ताह, जत्रा, धार्मिक व सांस्कृतिक सोहळ्यांतून भक्तिरस जागवणारे शेकडो कार्यक्रम सादर करत त्यांनी कोकण व मुंबई विभागात सांस्कृतिक चेतना निर्माण केली आहे. नव्या पिढीला भजन व संगीताचे प्रशिक्षण देत भजन परंपरा पुढे नेण्याचे महत्त्वपूर्ण कार्यही ते करीत आहेत.

या सन्मानामुळे नेरूळ, नवी मुंबई तसेच संपूर्ण कोकण परिसरात आनंद व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून सामाजिक, सांस्कृतिक व अध्यात्मिक क्षेत्रांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.