हार्बर लोकलमध्ये सानपाडा रेल्वे स्टेशन जवळ चाकूहल्ला; युवक गंभीर जखमी

  • Admin
  • नवी मुंबई
  • Dec 25, 2025

जुन्या वादातून चालत्या ट्रेनमध्ये हल्ला, आरोपी फरार

मुंबई : हार्बर रेल्वे मार्गावरील लोकल ट्रेनमध्ये मंगळवारी सकाळी थरारक घटना घडली. मानखुर्द आणि सानपाडा रेल्वे स्थानकादरम्यान चालत्या लोकलमध्ये एका युवकावर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर वाशी येथील महापालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

जखमी युवकाचे नाव सिराज अब्दुल्ला शेख (वय २४, रा. चित्ता कॅम्प, ट्रॉम्बे) असे आहे. तो घणसोली येथील एका खासगी फायनान्स कंपनीत रिकव्हरी एजंट म्हणून काम करतो. पोलिसांच्या माहितीनुसार, हा हल्ला जुन्या वादातून करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास सिराज कामासाठी घरातून निघाला होता. मानखुर्द स्थानकात त्याची भेट मित्र मुबारक मोहम्मद खान याच्याशी झाली. त्यानंतर दोघेही सकाळी ७.५० वाजता पनवेलहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल ट्रेनच्या दुसऱ्या जनरल डब्यात चढले. गर्दी अधिक असल्याने दोघेही दरवाज्याजवळ उभे होते.

याच डब्यात सिराजच्या परिसरात राहणारा राजेश राजगम अरुंदविहार हा देखील प्रवास करत होता. काही दिवसांपूर्वी आरोपीचा परिसरातील एका महिलेशी वाद झाला होता. त्या वेळी सिराजचा भाऊ फिरोज याने मध्यस्थी केली होती. याच रागातून आरोपीने शेख कुटुंबाशी वैर धरले होते, असे पोलिस तपासात समोर आले आहे.

सकाळी सुमारे ८ वाजता ट्रेन वाशी स्थानकाच्या जवळ येताच आरोपीने अचानक सिराजवर चाकूने हल्ला केला. त्याने सिराजच्या मानेला, पाठीत, कंबरेत आणि छातीवर सपासप वार केले. हल्ल्यादरम्यान दोघांमध्ये झटापट झाली आणि चाकू ट्रेनच्या फर्शी पडला.

वाशी स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक २/३ वर ट्रेन थांबताच आरोपी पळून गेला. सिराजचा मित्र मुबारक याने त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला; मात्र गर्दीचा फायदा घेत आरोपी फरार झाला. दरम्यान, अफरातफरीत ट्रेन पुढे निघून गेल्याने जखमी सिराज सानपाडा स्थानकापर्यंत गेला.

सानपाडा स्थानकात सहप्रवाशांच्या मदतीने रक्तबंबाळ अवस्थेत सिराजला खाली उतरवण्यात आले. डब्यात पडलेला चाकू प्रवाशांनी त्याला दाखवला, तो त्याने पोलिसांकडे सुपूर्द केला. स्थानकप्रमुखांच्या केबिनमध्ये रेल्वे पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली.

यानंतर सिराजला तत्काळ वाशी येथील महापालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात त्याचे भाऊ नासीर व फिरोज यांच्या उपस्थितीत पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवला आहे. रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे.