उत्तम प्रशासक व कणखर नेतृत्व हरपले - वन मंत्री गणेश नाईक

  • Admin
  • महाराष्ट्र
  • Jan 28, 2026

मुंबई ।  आपल्या दूरदर्शी व कणखर नेतृत्वाने राज्याच्या राजकारणात आपला वेगळा ठसा उमटविणारे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या अकास्मिक निधनाची बातमी अतिशय वेदनादायक आहे. दादांच्या जाण्याने राज्याच्या राजकारणातील 'दादा' व्यक्तिमत्व हरपले, अशा शब्दांत वन मंत्री गणेश नाईक यांनी श्रद्धांजली वाहिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती येथे विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या जाण्याने राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली. महाराष्ट्राला लाभलेले एक अनमोल रत्न हरपल्याची भावना वनमंत्री नाईक यांनी व्यक्त केली. वनमंत्री नाईक यांनी शोकसंदेशात म्हटले आहे की, अजितदादांच्या कामाप्रति असलेल्या समर्पणाने राज्याच्या विकासाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले होते. स्पष्टवक्ते असले तरी कामाच्या दर्जाच्या बाबतीत ते गंभीर असायचे. कामातील हलगर्जीपणा त्यांनी कधीच मान्य केला नाही. प्रशासकीय कामावरील पकड व विकासाची दृष्टी असलेला जनतेचा नेता आज आपल्यातून निघून गेला. त्यांच्या जाण्याने कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. दादांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, ही ईश्वर चरणी प्रार्थना. पवार कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. त्यांच्याबरोबरच या अपघातात निधन झालेल्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत, अशा शब्दांत मंत्री गणेश नाईक यांनी श्रद्धांजली वाहिली.

००००

 महाराष्ट्राने कर्तुत्ववान नेता गमावला - डॉक्टर संजीव नाईक 

माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणातील एक पर्व संपुष्टात आलं आहे.

स्पष्टवक्तेपणा, निर्णयक्षमता आणि जनसामान्यांच्या प्रश्नांबाबत असलेली तळमळ ही त्यांच्या नेतृत्वाची खरी ओळख होती. ‘दादा’ हे अनेक पिढ्यांचे मार्गदर्शक होते.

राजकारणात पदे येतात-जातात, मात्र जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारी व्यक्तिमत्त्वे विरळाच असतात. अजितदादा पवार हे त्यापैकीच एक होते. महाराष्ट्राच्या सामाजिक-राजकीय वाटचालीत त्यांनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील.

त्यांच्या जाण्याने राज्याने एक कर्तृत्ववान नेता आणि समाजाने एक आपला माणूस गमावला आहे.

भावपूर्ण श्रद्धांजली.

— डॉ. संजीव नाईक

माजी खासदार

0000

 महाराष्ट्राची कधीही न भरून येणारी हानी - संदीप नाईक

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या निधनाची बातमी मनाला सुन्न करणारी असून, संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही कधीही न भरून येणारी हानी आहे.

दादा म्हणजे प्रचंड कामाचा झपाटा, निर्णयक्षम नेतृत्व आणि जमिनीशी घट्ट जोडलेला नेता. जनतेच्या प्रश्नांबाबत त्यांची तळमळ, स्पष्ट भूमिका आणि धाडसी निर्णयक्षमता यामुळे ते राज्याच्या राजकारणातील आणि समाजकारणातील एक प्रभावी पर्व ठरले.

अजितदादा कार्यकर्त्यांसाठी प्रेरणा, सहकाऱ्यांसाठी मार्गदर्शक आणि जनसामान्यांसाठी हक्काचे ‘दादा’ होते. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणातील एका युगाचा अंत झाला असून, राज्याने एक अनुभवी, कर्तृत्ववान आणि दूरदृष्टी असलेला नेता गमावला आहे.

या दुःखद प्रसंगी आम्ही पवार कुटुंबियांच्या तसेच राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराच्या दुःखात मनापासून सहभागी आहोत. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो आणि कुटुंबीयांना तसेच असंख्य चाहत्यांना हे दुःख सहन करण्याचे बळ देवो, हीच प्रार्थना.

दादांना भावपूर्ण श्रद्धांजली.

— संदीप नाईक,माजी आमदार